Wednesday, December 2, 2015

नजर

मनाच्या अस्मितेला कुठंतरी स्पर्श करुन जाणारी …. चुकलेल्या जगाच्या बाजारात आपलं वेगळेपण सिध्द करु पाहणारी …. मन मानेल त्या दिशेने आणि आपुलकीच्या धाग्यांनी गाठ मारणारी स्वछंदे विचारात डुबून गलेली …. मनाच्या गाभा-यात अनंत विचार प्रफुल्लीत करणारी …. मनमिळावू चेह-यांच्या शोधात चौफेरे कटाक्ष टाकणारी …. गुंतलेल्या देहाला थोडंसं सैल करु पाहणारी …. पाहिलेल्या प्रत्येक क्षणाला विसर पडलेली …. विसरलेल्या क्षणांची आठवणही नसलेली अनोळखी माणसांवर …. वस्तूंवर …. प्राण्यांवर …. अगदी वातावरणावर सुध्दा विस्तृत आकांक्षा घेऊन विराजमान झालेली …. ती चिमुरडी नजर …. !

कसंसंच कांहीतरी वेगळंच …. कशाचा तरी शोध …. जणू अगदी चुकल्याक्षणी पाहण्याची आतुरता …. रस्त्यावरच्या त्या अनंत विचार शक्तीस सामोरे जाण्याची कुवत अंगी बाळगून गंभीर पण; अनिश्चित हालचाल …. कुठल्या तरी चाकोरीबध्द जीवनासारखी …. वाटाडयाने आडवलेल्या वाटांचा राग …. पण तो व्यक्त न करण्याची मनाची सततची हुर- हुर …. उगवणा-या आणि मावळणा-या मनाचं वेगळेपण …. कडवट वेळ …. एक-एक क्षण सुध्दा जीवघेणा …. सर्व कांही परिपुर्ण पण मनाची अपरिपक्वता …. पिकलेल्या दृश्यांची गळून पडण्याची भितीही मनी विसावलेली …. !

डोळयातील आसवं अर्धाच प्रवास करुन थकलेली मनाची व्याकुळता पदरी बांधलेली कशासाठी हे सर्व ते ही ठाऊक नाही. चंचल मनाच्या वेडया भावनांची कुठंतरी गुंतवणुक करावी आणि मिळणा-या व्याजापोटी जगावं एवढीच जणु अपेक्षा. कोवळया मनाच्या त्या निर्भीड वातावरणासोबत कांही क्षणांचा तो झंझावात अर्धवट उरलेल्या शब्दांच्या मनात उफाळून येणारा वादळासमान जाणवणारा फक्त भास …. अवाजांची तीव्रता कमी-अधिक होण्याची जाणीवही स्वत:कडे न ठेवता इतरांसाठी दान करावसं वाटणारं विशाल मन मुक्त अशी श्वासात थोडीशी विषण्णता पसरल्याचा राग कुठल्या …. कोणाची …. कशासाठी पहावी लागणारी वाट. घोटभर पाण्याची तहान पण; सारा समुद्रच पिऊन टाकण्याची मनाची उर्मी. स्वत:च्या अस्तित्वाची आणि समाजाच्या बदलाची करावी लागणारी तुलना आणि त्या तुलनेतून पेटून उठणारं उव्दिग्न विचारांचं वादळ. त्या वादळात अज्ञान आत्मा स्वत्त्वाचा घेत असलेला शोध. शोधण्याच्या पलिकडे कांहीच न पाहू शकणारं आंधळं वात्सल्य …. अनंत विचारांना परत एकत्र करण्याचा असफल प्रयत्न …. प्रयत्नांना वास्तवाकडून होणारा प्रतिकार …. उंच भरारी मारुनही कांहीच न मिळाल्याचं दु:ख …. वेळेचा प्रवास मात्र अविरत चालू …. विचारांच होणारं मंथन …. हातातून निसटून गेलेली क्षणंाची मनाला येणारी चीड …. निसटलेल्या क्षणांचा इतिहासही खूप भयाण …. विसरायचाच पडत चाललेला विसर …. इतिहासाच्या छटाही खूप कडवट …. जीभ विसरायला कशी तयार असणार.

एकदम उठलेल्या आठवणींचे सुटे-सुटे होत जाणारे भाग …. सुटया-सुटया भागांच्या      दो-याला मारलेल्या गाठीप्रमाणे होणारा भास …. भासमान भविष्याची मनाला येणारी चीड …. चिडलेल्या चेह-यावरुन पुढे पुढे जाणा-या सावल्या …. सावल्यांचं भान येताच होणारी चिमुकली हालचाल …. त्या वेडया हालचालीत साठून राहीलेली माया …. मायेच्या विचारातून सावरताना आडवं येणारं दुबळं प्रेम …. प्रेमापोटी जगण्याची मनामध्ये उत्पन्न होणारी आशा …. आशेमुळं घडणारं निराशेचं दर्शन …. दर्शन न होता प्रणाम करण्याची धडपड …. धडपडणा-या भावनांना पुन्हा येणा-या त्या जिव्हाळयाच्या आठवणी.
या सर्व विचार चक्रात गेलेली वेळ किती ती केवढी भयानक होती म्हणून सांगावी …. भयाण काळाला सामोरे जाणारी ती निरस भावनांची वैफल्यग्रस्त वर्तुळे आणि त्यांच ते खंडीत न होता सतत चालणारं अविरत चक्र …. या कल्पनेमध्ये रममान झालेल्या जगाचं हे अजब कालसापेक्ष चित्र.

दुरुन येणा-या माणसांची जवळची ओळख वाटावी पण त्याच माणसाची अधिक जवळीक ही नकोशी वाटावी असं का ? कशासाठी ?

आता ती हालचाल गतिमान झालेली गरजेपोटी निघालेल्या शोधयात्रेची थोडंस चालूनही खूप दूर आल्याचा होणारा भास …. तिचतर खरी चिमुरडया पावलांची ओळख …. वातावरणाच्या तापामुळं क्षीण होत जाणारे ते अपुर्ण विचार …. थकलेल्या पायांनी परत चालावं …. चाललेल्या पावलांचं भानही नसावं.

पाठीमागच्या रस्त्याची आठवण आली की, परत परतीचा प्रवास करावासा वाटे …. परत मनाची व्दिधा …. मग पुढची स्वप्न पाठीमागच्या आठवणीवर विजय मिळवत असायची ती केवळ कांही क्षणांपुरतीच. दमलेल्या पायांचा कुठंतरी विसावण्याचा अति होणारा लाड …. लाडावलेल्या पायांना मन करत असलेला विरोध …. पण; मनालाही तिथे स्विकारावी लागणारी हार …. पोटात उठलेली भूकेची आग आणि तिला थंड करण्यासाठी प्यावीशी वाटणारी आशेची नीरस हवा. पण; संघर्षापुढे निभाव न धरु शकणारी ती हवा …. भुकेपोटी संघर्ष करण्यास तयार झालेलं ते चिमुरडं धाडस पण; संघर्ष तरी कोणाशी …. इतिहासाशी …. वर्तमानाशी की, भविष्याशी ? या परिस्थितीने बारगळलेलं काळीज समोर पाहावं तर आठवणी दिसतात आणि पाठीमागं फिरावं तर भविष्य सतावतं जणु जात्यात अडकलेल्या पिवळीच्या धान्यासारखं ….

आता …. ! आता, मुक्तपणे प्रवास चिरडलेल्या आठवणींना आणि भविष्यातील सावलीला स्मरुन. कुणाच्या तरी मनाला साद घालण्यासाठी वितभर पोटाच्या भुकेसाठी.

नवीन क्षितीज …. नवीन नाती …. नवीन इच्छा …. नवीन अपेक्षा …. नव्या मनाच्या शोधात अगदी सर्व कांही नवीनच ….. मात्र आठवणींची सोबत तेवढी जुनी आणि त्याचं सतावणही जुनचं राहिलेलं, का कुणास ठाऊक?

आता …. मन गहिवरलेलं …. गहिवरलेल्या मनाला कुणाची तरी भिती …. कुणाचं तरी दडपण …. पण; कशाचं व कशासाठी हेच ठाऊक नसलेलं जीर्ण होत चाललेलं शरीर.

“सर्वस्व संपूणही न संपलेली आशा,भूक आणि आशेसाठीच,भुकेसाठीच आता आपलं पुढचं आयुष्य, पुढचं जगणं आणि जग सुध्दा”. हाच एकमात्र विचार ते वेडं मन, शहाणं बनून करत होतं.

नियतीच्या कुठल्या घरातून आपण आलो आणि आता; काळाचं कुठलं दार ठोठवायचं हेच आठवत नव्हतं हया वेडया चिमुरडया नजरेला …. !

No comments:

Post a Comment