Monday, December 28, 2015

शांति.........


मानवी जीवनातील संवेदनांचा शोध घेऊन त्यातील साध्य शोधण्यासाठी आयुष्यभर सहनशीलतेची सर्व शिखरे पादाक्रांत करणा-या एका व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याची अखेर.
अगदी मोहून टाकणारा एखादा क्षण आणि त्या मोहकतेची कल्पना पुन्हा-पुन्हा करावयास भाग पाडणारी त्याची छाया …. शांत …. तरलत्या अस्मांत छायेची फक्त हलचाल …. वातावरणाला स्वत:च वेगळेपण पटवुण देण्याचे कार्य करणारी …. बुडत असलेल्या अनेक आशांना सावरणारी …. काळजाचे कंप वाढवणारी …. अविरत ध्येयापोटी पण, …. सहजतेची …. वाट पाहून-पाहून थकलेली …. परंतु मुद्रेवर कसलीच खंत व्यक्त न करता …. येत असलेल्या क्षणांच स्वागत तितक्याच स्फुर्तेने करण्याच जणू अंगी अवसान बाळगणारी …. बरबटलेल्या भावनांना पुन्हा उजाळा देणारी …. अतिवेगाने धावणा-या त्या अदृश्य शक्तीला थोड थांब …. अशी विनवण करणारी …. ती शांति ….

जिला वादळाशिवाय आणि वादळ येण्याच्या अदी कधीच किंमत आली नाही. जिथं सर्वस्व जीवन त्या दोन घटनांच्या मध्येच बंदिस्त …. हालचालीचा उहापोह फक्त तिच्या नशीबी आणि नशीबही तेवढच सतेज …. मनमोकळया स्वभावान जिला सर्वस्व उधळुन देण कधी जमलच नाही. पण, अनेकांच्या पुर्ततेसाठी जिचं जगणंही तेवढच महत्त्वाचं.

खरचं माणसाच जीवन हे असंच असतं. कधी-कधी वास्तव हे खूप विचीत्रच म्हणावं लागेल. माणूस जन्माला येण्यापुर्वी  अनेक मनांमध्ये उठलेल ते वादळ …. जन्माच्या वेळची ती निपचीत शांतता आणि परत उठलेले त्याच मानवी वृत्तीमध्ये वेग-वेगळया भावनांचे तरंग …. किती भयानक हे चित्रण …. आणि त्याचा चित्रकारही ….

अशीच एक आठवण मला आजही तितक्याच प्रखरतेने आठवते. मानवी मनाच्या गाभा-यात कुठतरी स्पर्श करुन जाणारी …. नियतीच्या कल्लोळात ओली चिंब होऊन कुडकुडणारी; वास्तवाच्या थंडीने …. माझ्या बापाची ती आठवण …. अगदी गोठलेल्या पाण्याच्या बर्फासारखी …. हळुवारपणे …. वितळत जाणारी …. वेळेच्या बंधनाप्रमाणं …. सत्तेनं-सत्त्यावर केलेल्या स्वारी सारखी …. जीवनाच्या अंतीम सत्याची.
आयुष्यभर दुस-यासाठी राबणा-या हातांची …. सुख-दु:खाच्या सागरात, सुखाला मान देऊन दु:खालाही तितक्याच प्रेमानं कुरवाळणारी. संसाररुपी देहाच्या प्रत्येक वाटा विचार करुन उचलणारी …. इतरांच्या सुखासाठी स्वत:च दु:ख औषधाच्या गोळीप्रमाण गिळणारी आणि त्याचा परिणाम समाजावर किती लवकर होईल याची वाट पाहणारी …. कवडीमोल देहाला कवडीवजा किंमत देणारी …. रापलेल्या जखमांवर मीठ विकत घेऊन घासणारी …. सडलेल्या इच्छेवर जगणारी …. कुणाच्या तरी स्पंदनासाठी स्वत:च -हदय गहाण ठेवणारी …. जीवणाच्या विशाल अशा समुद्रामध्ये स्तत:ची लहान माशाची भूमिका निशंकपणे वटवणारी …. क्रुरतेच्या बाजारात प्रेमाची विक्री करणारी …. अप्रिय वस्तूवर जिव्हाळयाचं लेबल लावणारी …. आणि झिजलेल्या चंदणासारखी फक्त सुगंधातूनच आठवणारी.

खरचं किती भयानक होती ती वेळ …. सर्वांच्या मनाला स्पर्श करणारी. मानवी मनाच्या कल्पनेच्या बाहेरची …. जगाचा निरोप घेऊन जाताना माझ्या ‘बा’ ची …. आता सर्व सोडावं लागणार या विचारानं मनात माजलेलं ते काहूर …. मनातलं सर्व कांही सांगावं या इच्छेने मुखाची होणारी फुसट हालचाल पण, निश्पन्न कांहीच नाही. ऐकणा-यानं जीव कानात आणावं अन्        बोलना-यानं बोलूच नये. खरंच ज्याचं सुत्रसंचालन ऐकलं ज्याचं प्रास्तावीक पटलं ज्याची प्रमुख पाहूण्याची भूमिका आवडली ज्यानं कधी अध्यक्षपद जितक्या काळजीनं जपलं…. पण, ऐन आभार प्रदर्शनाच्या वेळी आम्ही बहीरं व्हावं किंवा त्यानं मुकं व्हावं हे नियतीला कितपत मान्य होतं….

जीवाची ती कोंदट अवस्था सर्व कांही देण्यासाठी असुनही देणा-याचे हात कापले नावी तशी …. मनात दडलेल्या सर्व भावनांना माणूस व्यक्त करतो असेही नाही पण, भावनाही तितक्याच गोड किंवा कडू असतात हे चेहरा कधी-कधी लपवत नाही परंतु, ज्या भावना खूप प्रखर असतात त्या नाहीत ओळखता येत कशानेही …. जर त्या ओळखण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या भावनेच्या चक्रीवादळात सापडुन आपण आपलेपण विसरल्याशिवाय राहणार नाही. शरीरातलं सर्वकांही एकत्र करुन बोलण्याची उर्मी पण, आवाजाच्या भांडवलाशिवाय तिला काडीमात्रही किंमत राहणार नाही. आयुष्यभर ज्याच संभाषण बहि-यानं सुध्दा ऐकलं त्याचं बोलण ऐकणं आज आमच्या नशीबी नसावं  ! …. त्या क्षणी मला वाटायचं प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त नसून हवेचाच जास्त असावा कारण माझ्या बापाच्या तोंडुन फक्त शब्दांची हवा येत होती आणि ध्वनीची वाट पाहण्याकरता विवष करत होती. ज्याचं जीवनभराचं बोलणं व्यक्त करायच्या आधी उमगलं त्याच आजचं बोलणं ओळखणं हे खूप भयानक वाटु लागलं …. मनामध्ये एखादया गोष्टीची धास्ती उत्पन्न व्हावी ना तसे. त्याला काय बोलायचे होते ते काळाला तरी कळाले असेल का ? त्याची प्रखर वाक्य काळाला तरी पचली असतील का ? त्याच्या अंगी ती सांगण्याची कुवत असेल का ? सांगण्यासाठी तो तोंड उघडेल का ? आणि ती मला सांगेल का ? …. किती …. किती …. अतुरता ….

ती मुखाची हालचाल आता बदलत होती …. भौतेक त्यालाही कळालं असावं …. आपलं हे कार्य विशाल अशा समुद्रात लहान माशाच्या शोधात निघालेल्या त्या कोळयासारखं आहे. ! …. शेवटी ती हवाही बंद झाली आणि ओठ मिटले गेले …. त्या ओठांवर कांही आर्त ओली आता दिसत नव्हत्या तर फक्त स्मितहास्य …. त्या स्मितहास्याकडं पाहूण मला वाटत होतं …. एखाद नाटक सुरु व्हावं …. प्रेक्षकांचा भयाण प्रतिसाद त्याला मिळावा …. त्या नाटकातल्या पात्रानं प्रवेश करावा …. न बोलताच निघून जावं …. फक्त जाताना एकदा ओळून पहावं …. आणि प्रेक्षकांनी टाळया वाजवाव्या अगदी तसं. पण, वाटणं आणि असणं यात खूप मोठी दरी वास्तव करत असते. ते स्मितहास्य इतकं बलवाण होतं की, ते पाहुणच माझं मन ताकतीनं भरुन गेलं माझी ताकत दुप्पट झाल्याचा मला जणू भासचं. त्याच ताकदीवर मी तिथले क्षणभंगुर जीवन जगू पहात होतो. माणसाची वृत्ती ही चंचल असते ती एका ठिकाणी कधीच वास्तव्य करत नाही सतत तिची हलचाल चालु असते. अगदी तशीच माझीसुध्दा माझी नजर बापाच्या नजरेला जाऊन भिडली आणि …. खरचं, आयुष्यभर जेवढी पुस्तकं मी वाचणार होतो, त्याचं सारचं जणू ते असावं सरळ-सोप…. साधं …. खूप कांही होतं त्या डोळयांत कसलाही पंडित नव्हता वाचू शकत ते गहण काव्य …. सुख-दु:ख …. आशा-निराशा …. जन्म-मृत्यू …. सजीव-निर्जीव ….   होय-नाही …. गाव-विश्व …. यांच्या खूप पलीकडलं ते तत्त्वज्ञान असावं …. खूप-खूप दुरचं …. त्या डोळयांनी इतरांच दु:ख पाहीलं होतं…. जखमा पाहिल्या होत्या …. तसेच, दुध    पिना-या वासराला चाटणारी गाय पाहीली होती तशीच, दुस-याला दु:ख देऊन स्वत: सुखाचे झेंडे म्हणुन मिरवणारी माणसे सुध्दा. त्यांच्या सर्व आठवणी आज माझा बाप का आठवू शकत नव्हता कोण जाणे पण, त्यांच शैल्य मात्र अंदुक दिसत होतं. ते अंदुक का होतं याचा विचार करनं मला त्या वेळी तितक महत्त्वाचं वाटलं नाही. खरचं सर्वच होतं त्या डोळयांत …. सर्वकांही …. आयुष्यभर जे तत्त्वज्ञान ऐकलं होतं त्यानं की, अपवादामुळेच सिध्दांताला किंमत असते, तेच आज मी विसरलो होतो कारण मला त्याच्या डोळयात शोधुनही …. खूप खूप शोधुनही अपवादाचा तसुभरही पुरावा मिळत नव्हता. खरचं आज माझ्या डोळयांनी सर्व कांही …. सर्वच …. पाहीलं होतं धन्य झालते माझे डोळे …. या जगातलं कुठलच स्थळ पाहण्याची माझी आशा उरली नव्हती. त्याच क्षणी वाटलं आपण आता आंधळे झालो तरी चालेल. !
 
मी पुन्हा-पुन्हा त्या डोळयात कांहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो …. पण काय शोधत होतो हे माझे मलाच कळत नव्हते. शोध मात्र चालूच…. शोधून शोधून थकलो पण ते सापडलं नाही कारण काय शोधायचं हेच मला उमगत नव्हते. तरीपण पुन्हा प्रयत्न पुन्हा ते विशाल विश्व …. ते सर्वस्व …. पण, ऐकाऐकी माझे डोळे दचकले,चमकले,भिले,चिडले, सर्व कांही पाहुन देखील खूप कांही विसरले…. ज्या डोळयात मी सर्वस्व पाहीले ते डोळे मला पुन्हा कांहीच दाखवतं नव्हते. …. सर्वस्व संपले होते. !    

ते डोळे उघडे होते पण कांहीच बोलत नव्हते …. जेंव्हा उघडे होते, तेंव्हा कांहीच शोधू शकलो नाही मात्र ज्यावेळी ते झाकले त्यावेळी खूप कांही शोधायचं राहून गेलं.

No comments:

Post a Comment